धुळे : गावात दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास का देता, याची विचारणा करायला गेलेल्या एका ४७ वर्षीय इसमाला मारहाण करून त्याच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गावात १ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिस पाटलाच्या घरासमोर घडली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात १० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाम्हणे गावात संशयित आरोपी हे गावात दहशत निर्माण करून सर्वसामान्य लोकांना नेहमी त्रास देतात. याचा जाब ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील (वय ४७, रा. बाम्हणे) यांनी दोन-तीन वेळा विचारला. याचा संशयित आरोपींना राग होता. हा राग मनात धरून आरोपींनी १ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिस पाटील दीपक बिऱ्हाडे यांच्या घरासमोर त्यांना शिवीगाळ केली. आरोपींपैकी अमोल निकम (वय २१) याने ज्ञानेश्वर पाटील यांच्या मानेवर चाकूने वार केला. तो वार त्यांनी चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकू गालाला लागल्याने, ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिरपूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी ए. एस. आगरकर, शिंदखेड्याचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील यांनी दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनील निंबा भिल (वय २३), अमोल अंबू निकम (२१), समाधान मच्छिंद्र भिल (२४), आयुष सुनील मोरे (२०), विशाल किसन पाटील (२१), मुकेश मुरलीधर रगडे (२३), सचिन संजय जगदाने (२५), प्रशिक मधुकर जाधव २८), गणेश एकनाथ भिल (२३), जयराम राजू भिल (२७, रा. सर्व बाम्हणे, ता. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे करीत आहेत.