नारायणगाव: महादेव बुक व लोटस ३६५ या बेटिंग ॲपवरून ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या नारायणगाव येथील तीन मजली इमारतीवर पुणे ग्रामीण पोलिस पथकाने धाड टाकून सुमारे ९० कर्मचाऱ्यांसह जुन्नर तालुक्यातील दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर व्हिजन गॅलेक्सी येथे चार मजली इमारत १ लाख ६० हजार रुपये प्रति मासिक भाडे तत्त्वावर घेऊन या ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून हे बेटिंग ॲप सुरू होते. या बेटिंगचे मुख्य सूत्रधार ऋतिक कोठारी (रा. नारायणगाव), राज बोकरीया (रा. जुन्नर) हे दोघे जण असून ते फरार आहेत. या दोघांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये इमारत भाड्याने घेतली होती. या इमारतीमध्ये सुमारे ९० कर्मचारी कार्यरत होते.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना ऑनलाइन बेटिंगची माहिती मिळाल्यानंतर १४ मे रोजी रात्री ११ वाजता खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २० ते २५ जणांच्या पोलिस पथकाने या इमारतीवर धाड टाकली. या इमारतीमध्ये सुमारे ९० कर्मचारी कार्यरत होते. त्यांना जेवण बनवून देण्यासाठी ६ ते ७ कर्मचारी कार्यरत होते. बेटिंग घेणाऱ्या ९० कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कॉल सेंटर प्रमाणे येथील कर्मचारी कार्यरत होते. येथे जेवण व राहण्याची सोय आतच होती. कोणालाही बाहेर जाण्याची मुभा नव्हती. जुन्नर, महाराष्ट्रातील काही कर्मचारी सोडले तर बहुतांश कर्मचारी परप्रांतीय आहेत. सर्व कर्मचारी शिफ्टनुसार काम करत होते. अनेक संगणक, लॅपटॉप, आयपॉडद्वारे बेटिंग आणि आर्थिक देवाण-घेवाण सुरू होती.
पैशांची ट्रान्सफरसाठी स्वतंत्र कर्मचारी
महादेव बुक व लोटस ३६५० या ॲपमध्ये विविध खेळांचे सट्टे, सर्व गेम्स खेळले जात असत. जिंकणारे व हरणाऱ्या व्यक्तींना पैशांची देवाण-घेवाणीसाठी स्वतंत्र व्यवस्था ठिकाणावरून वापरली जात होती. दररोज सुमारे ५० लाख रुपयांचे बेटिंग या ठिकाणी केले जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तसेच, वेगवेगळ्या अकाउंटवरून पैशांची ट्रान्सफर करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक होती. या ठिकाणाहूनच मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण सुरू होती, असे पोलिस पथकाला आढळून आले आहे. मात्र, यासंदर्भात उशिरापर्यंत पंचनामे व माहिती घेण्याचे काम सुरू असल्याने पोलिसांनी अधिकृत वृत्त दिलेले नाही. तथापि पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या बेटिंगचे मुख्य सूत्रधार ऋतिक कोठारी व राज बोकरीया हे असल्याचे स्पष्ट करीत ९० कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचं लोण पोहोचले पुण्यात
परदेशासह देशातील विविध राज्यांतील छापेमारीनंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपचे लोण पुण्यातील नारायणगावपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. महादेव बेटिंग ॲप हे ऑनलाइन सट्टेबाजीसाठी डिझाइन केलेले ॲप आहे. यावर यूजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाचे लाइव्ह गेम्स खेळतात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल सारख्या खेळांवर यासोबतच निवडणुकांवर अवैध सट्टा लावला जायचा. याचे सर्वाधिक खाते छत्तीसगडमध्ये उघडण्यात आले होते. त्यामुळे महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपप्रकरणी छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचे नावही चर्चेत आले होते. तेव्हापासून महादेव बेटिंग ॲपप्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळेमुळे आता पुण्यातील नारायणगावपर्यंत पोहोचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत समोर आले आहे.
बुधवारी ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे एका इमारतीवर छापेमारी केली असून या संपूर्ण इमारतीत महादेव बेटिंग ॲपचे काम सुरू असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः परप्रांतीय तरुण बुकिंगचे काम करत होते. घटनास्थळी बुकिंगसाठी वापरले जाणारे मोबाइल, लॅपटॉप आदी साहित्य आढळून आले आहे. पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मनी लॉड्रिंगप्रकरणी सरकारने गेल्या वर्षी महादेव बेटिंग ॲप व वेबसाइटवर बंदी घातली होती. या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत बॉलीवूड सेलिब्रिटी व राजकारण्यांची चौकशी केली आहे. तर, अभिनेता साहिल खान याला अटक करून त्याचीही चौकशी करण्यात आली आहे.