पुणे : कंज्यूमर फोरमधून बोलत असल्याचे सांगत डेबीट कार्डची माहिती घेत ८० हजार आणि लकी ड्रॉ लागल्याचे सांगून बॅक खात्याची माहिती घेत ४२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून फसवणूक केल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. यातील पहिल्या प्रकरणात ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी यांच्या मुलीने क्लब फॅक्टरी अॅपवरून ऑनलाइन खरेदी केली होती. त्याच्या रिफंडसाठी कंज्युमर फोरम बोर्डकडे तक्रार केली. या तक्रारीचा गैरफायदा घेत आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीचा नंबर मिळवला व त्यांना फोन करून कंज्युमर फोरम बोर्डमधून बोलत असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या डेबीट कार्डची माहिती घेवून ३ नोव्हेंबर २०१८ रोजी ८० हजार १८१ रुपये ऑनलाइन काढून घेतले. फसवणुकीच्या दुस-या प्रकरणात कोंढवा येथे राहणा-या एका ४२ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने १९ डिसेंबर २०१८ रोजी फिर्यादी यांना फोन करून अॅमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर लकी ड्रॉ लागल्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या खात्याची माहिती घेतली. गिफ्ट न देता फियार्दी यांच्या खात्यातून ४२ हजार ८ रुपये काढून घेवून फसवणूक केली.
पुण्यात ऑनलाइन पद्धतीने सव्वा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:12 PM