नालासोपारा : गुगलवरून मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम दुस-या खात्यात ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक करणा-या तिघांना वालीव पोलिसांनी गजाआड केली असून त्यांना वसई न्यायालयात हजर केले. त्यांना १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यांचे कोण कोण साथीदार आहेत, यांनी कोणकोणत्या ठिकाणी या घटना केल्या आहेत याचा पोलीस शोध घेत आहे.वसई पश्चिमेकडील दिवाणमान परिसरातील अंबाडी रोडवरील रामचंद्र अपार्टमेंटमधील सदनिका नंबर बी/२०७ मध्ये राहणारे देवेंद्र अमरनाथ सिंग (४२) यांचा मनी ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय असून वसई पूर्वेकडील चिंचोटी येथे सत्यम शिवम कम्युनिकेशन नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या पी.डी. खात्यामधून २६ जूनला सायंकाळी ८ लाख ३७ हजार ९९८ रु पये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याने वालीव पोलीस ठाण्यात १ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासावरून एका टोळीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर या आरोपींनी गुन्हा कसा केला याची माहितीच उघड केली. याप्रकरणी राजू कुमार विनोद प्रसाद (२४), सरोजकुमार महेंद्र सिंग (२२) आणि नितीशकुमार रणजित प्रसाद (२१) या तिघांना मंगळवारी रात्री अटक केले असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:52 PM