मुंबई-
देशभरात अँड्रॉइड, अॅपल फोन विक्रीच्या नावे भंगारात निघालेले जुने फोन तसंच बटाटे, दगड पार्सलमधून पाठवणाऱ्या एका गँगचा मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट ११ ने पर्दाफाश केला आहे. मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट ११ ने मालाडच्या एका गोदामावर छापा मारुन ही कारवाई केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महागडे फोन स्वस्तात विकण्याच्या जाहीरातातून ग्राहकांना फसवलं जात होतं. ग्राहकानं जाहिरातीवर क्लिक केलं आणि फॉर्म भरला की लगेच त्याला फोन यायचा. तुम्हाला तुमचा फोन घरपोच कॅश ऑन डिलिव्हरी मिळेल असं सांगितलं जात असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक करणारी गँग ग्राहकाला नव्या फोनऐवजी जुना आणि स्वस्त फोन पॅकिंग करुन पाठवला जायचा. यात कधीकधी तर चक्क बटाटे आणि दगडही भरले जायचे. ही गँग खासकरुन मुंबईबाहेरील व्यक्तीला टार्गेट करत असत. यात बहुतांश ग्राहक दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा, झारखंडमधले निवडले जायचे. इतर राज्यांच्या पोलिसांकडून वारंवार मिळणाऱ्या तक्रारींच्या आधारे मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवत मालाडमधील एका गोदामावर छापेमारी केली. याठिकाणी पोलिसांनी अवैधरित्या कॉल सेंटर चालत असल्याचं दिसून आलं. यात सर्व खराब मोबाइल नव्या बॉक्समध्ये भरण्याचं काम चालू होतं. इथूनच देशात ठिकठिकाणी खराब मोबाइल किंवा मोबाइलच्या जागी दगड आणि बटाटे पाठवण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांना लक्षात आलं.
क्राइम ब्रांचनं दोन आरोपींना अटक केली असून हे दोघंही सोशल मीडियात ४,५०० रुपयांत स्मार्टफोन अशी जाहीरात देऊन लोकांना गंडा घालत होते. क्राइम ब्रांचनं या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ हून अधिक मुलींनाही ताब्यात घेतलं आहे. या सर्व मुलींना साक्षीदार म्हणून कोर्टात सादर करण्याची पोलिसांनी तयारी केली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणामागच्या मास्टरमाइंडचा शोध घेत आहेत.