पिंपरी : ऑनलाईनद्वारे मोटार विकण्याचा बहाणा करुन तरुणाला बँक खात्यात सव्वा दोन लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, मोटार न देता तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मयुर दिलीप चव्हाण (वय १९, रा. मयुर निवास, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तामीर तेजकुमार (रा. अहमदाबाद सी.एस.डी. गुजरात) , कल्लु व राम (दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चव्हाण यांना मोटार घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर शोध घेतला असता एक मोटार त्यांना पसंत पडली. त्यानंतर त्यांनी आरोपींना संपर्क साधला असता त्यांना त्यांच्या बँक खात्यावर २ लाख २४ हजार ९९५ रुपये भरण्यास सांगितले. मात्र, मोटार पाठविलीच नाही. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.