ऑनलाईन फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉ़लवर बोलणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलीसमध्ये आरटीओ अधिकारी असल्याचं सांगितलं. तरुणीला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्यामध्ये तिच्यावर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी '1' दाबा, असं कॉलवर सांगण्यात आले.
स्वत:ला आरटीओ अधिकारी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने तरुणीविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. मुंबईतील न्यायालयात यावं लागणार असल्याचं सांगितलं. सुरुवातीला पीडितेने हे सर्व आरोप फेटाळून लावले. तिने सांगितलं की ती बंगळुरूमध्ये राहते आणि अलीकडे मुंबईलाही गेलेली नाही.
आरटीओ अधिकाऱ्याने तरुणीचा कॉल दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख पोलीस अधिकारी अशी करून दिली आणि तरुणीला स्काईपवर तिचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले. तरुणीने स्काईप कॉल दरम्यान आधार कार्डचा तपशील दिला आणि स्वतःबद्दल सांगितले. यावेळी घोटाळेबाजांनी बँकेचे तपशीलही मिळवले. यादरम्यान महिलेला सांगण्यात आलं की, तिचं बँक खातं टेरर फंडिंगसाठी वापरले जात होतं, हा मोठा गुन्हा आहे.
तरुणी यामुळे घाबरली. या बनावट पोलिसाने केस संपवण्यासाठी काही पैसे मागितले. यानंतर तरुणीने लगेचच तिच्या बँक खात्यातून 96,650 रुपये इतर दोन बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तरुणीकडे आणखी काही पैसे मागितले, जे देण्यास तिने नकार दिला. यानंतर तरुणीला संशय आला आणि तिने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.