डोंबिवली : ब्रिटन वरून पाठवलेले गिफ्ट पार्सल इंडियन कस्टमने पकडले असून, त्याची कस्टम ड्युटी म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यावर काही रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगून एका तरुणीला ७३ लाख आठ हजारांचा ऑनलाइन गंडा घातला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेली २९ वर्षांची तरुणी डोंबिवली पूर्वेतील पलावा, कासाबेला गोल्ड परिसरात राहते. डॅनियल जेन्स नामक व्यक्तीने एका मोबाइल नंबरवरून तक्रारदार तरुणीशी व्हॉट्सॲपद्वारे चॅटिंग करून मैत्री केली. मैत्रीच्या माध्यमातून ओळख वाढवली आणि ब्रिटनमधून गिफ्ट पार्सल पाठवतो, असे तिला त्याने सांगितले. त्यानंतर त्याने फ्रॅक विल्सन, जॅक्सन, जोन लॅम्बर्ड, रियाझ यांनी विविध मोबाइल क्रमांकावरून तरुणीला संपर्क साधत ब्रिटन वरून पाठवलेले गिफ्ट पार्सल इंडियन कस्टमने पकडले असून, त्याचे कस्टम ड्युटी म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ७३ लाख आठ हजार रुपये ट्रान्सफर कर, असे सांगून त्या तरुणीची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. हा सर्व प्रकार १० नोव्हेंबर २०२१ ते २५ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
ऑनलाइनद्वारे घातला ७३ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 2:27 PM