गुजरातमधील खेडा येथे ऑनलाईन गेम खेळायला मोबाईल न दिल्याने थोरल्या भावाने धाकट्या भावाचा जीव घेतला. वास्तविक, दोन सख्ख्या भावांमध्ये मोबाईलवरून भांडण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय भावाने आपल्या धाकट्या भावाचा दगडाने ठेचून खून केला. यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला.खेडा शहर पोलीस उपनिरीक्षक एसपी प्रजापती यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी गोबळेज गावात घडली असून बुधवारी अल्पवयीन भावाला ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हे कुटुंब राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील असून ते खेडा गावात मजुरीचे काम करण्यासाठी आले होते.प्रजापती यांनी सांगितले की, 23 मे रोजी दोघे भाऊ मोबाईलवर गेम खेळत होते. दरम्यान, आरोपीचे त्याच्या 11 वर्षीय लहान भावासोबत भांडण झाले. खेळण्याची पाळी असताना त्याला मोबाईल देण्यास धाकट्या भावाने नकार दिला होता. रागाच्या भरात धाकट्या भावाच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार केले. या हल्ल्यात धाकटा भाऊ बेशुद्ध झाला. यानंतर थोरल्या भावाने धाकट्या भावाला दगड बांधून जवळच्या विहिरीत फेकून दिले. यावेळी या दोघांशिवाय अन्य कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते.त्यानंतर आई-वडिलांना न सांगता थोरला भाऊ बसमध्ये बसून राजस्थानमधील आपल्या गावी गेला. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न भेटल्याने पालकांनी त्यांच्या गावी चौकशी करून मोठ्या मुलाची माहिती घेतली. त्यांनी त्याला परत बोलावून त्याच्या धाकट्या भावाबाबत विचारणा केली असता, भांडणानंतर आपणच त्याची हत्या केल्याचे त्याने सांगितले. बुधवारी कुटुंबीयांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.