नवी दिल्ली - लहान मुलांना ऑनलाईन गेमचं अक्षरश: वेड लागलं आहे. या गेमच्या नादामुळे मुलं वेगवेगळे कारनामे करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांचा हैराण करणारा कारनामा समोर आला आहे. ऑनलाईन गेमच्या नादापायी दोन भाऊ बेपत्ता झाले. भयंकर बाब म्हणजे त्यांनी घरातून तब्बल 30 हजार चोरले आणि रात्रभर ते पार्कमध्ये गेम खेळत राहीले. मिळालेल्या माहितीनुसार, साहिबाबादमधील शालीमार गार्डनमध्ये राहणारे 12 वर्षे आणि 9 वर्षे वय असलेले दोन भाऊ ऑनलाईन गेमच्या नादात घराबाहेर पडले.
मुलं तब्बल 16 तासांपर्यंत बेपत्ता होती. पोलीस आणि एनजीओच्या मदतीने दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन जडलं होतं की मुलांनी घरातून 30 हजार रुपये चोरले होते, 12 वर्षांचा मोहित आपल्या आई-वडिलांसह शालीमार गार्डन येथे राहतो. तो सातवीत शिकतो. लॉकडाऊनमध्ये जेव्हा शाळांनी ऑनलाईन क्लास सुरू केला तेव्हा कुटुंबाने आपला फोन त्यांना दिला. याच दरम्यान मोहितने आपल्या मित्रांसह मोबाईलवर गेम पाहण्यास सुरुवात केली.
मुलांचा हैराण करणारा कारनामा
मित्रांनीही गेमसाठी त्याचा आयडी तयार (ID) केला. आयडी तयार केल्यानंतर आपल्या फोनवरुन मोहितने पबजी खेळण्यास सुरुवात केली. गेममध्ये पुढे जाण्यासाठी पैशांची गरज असते. मात्र मोहितला गेमसाठी घरातून पैसे दिले जात नव्हते. यासाठी तो कधी आपल्या वडिलांच्या खिशातून तर कधी आईच्या पर्समधून पैसे काढत होता. पबजी बंद झाल्यानंतर त्याने फ्री फायर खेळण्यास सुरुवात केली. मोहित 30 डिसेंबर रोजी आपल्या घरातून 30 हजार रुपये घेऊन फरार झाला.
ऑनलाईन गेमसाठी घरातून चोरले तब्बल 30 हजार अन् रात्रभर...
मोहितने कोणाच्या मदतीने 18 हजारांचा मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि हेड फोन खरेदी केले. ही दोन्ही मुलं इतकी स्मार्ट होती की ते सिमकार्ड न घालता देखील फक्त वायफायच्या मदतीने कनेक्ट करून गेम खेळत होते. यादरम्यान कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. अनेकांची चौकशी सुरू केली. त्यांना दिलशाद गार्डन येथून पकडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.