मुंबई : सणासुदीच्या काळात ऑनलाइन पार्सल आल्यानंतर ते उघडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात ऑनलाइन भामटे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी फेस्टिव्हल ऑफरमध्ये खरेदी केलेल्या वस्तूच्या पार्सलमध्ये भलतीच वस्तू पाठवून ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे गरजेचे आहे. कारण, यातून फसवणूक झाली तर सायबर सेलला तक्रार करताना पुरावे लागतात. त्यामुळे हा व्हिडीओ आपल्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरतो.
पार्सल फोडण्यापूर्वी ही घ्या काळजी अनेकदा ऑनलाइन वस्तू आल्यानंतर पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी साबण, कॅमे-याऐवजी वीट किंवा दगड मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल मागविले तिथूनच आले आहे का, याची तपासणी करावी. तसेच पार्सल घेतल्यानंतर ते पार्सल कुरिअर बॉयसमोर किंवा रिटेलरसमोर उघडून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे.
फसवणूक झालीच तर....ऑनलाइन वेबसाइटवरून मागवलेल्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू मिळाल्यास सुरुवातीला ज्या कंपनीकडून ती वस्तू मागविली, त्या कंपनीकडे आणि रिटेलरकडे तक्रार करावी. तसेच त्या वस्तूचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तसेच सायबर सेलकडे तो व्हिडीओ सादर करून तक्रार दाखल करावी.दिवाळीच्या काळात विविध ऑफरचे आमिष दाखवत सायबर ठग फसवणूक करत आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा. तसेच पार्सल उघडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
फसवणुकीच्या तक्रारीयंदाच्या वर्षी मुंबईत ऑनलाइन फसवणुकीचे ५०० हून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यापैकी अवघ्या ५० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडे नोंद असलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे.