उल्हासनगर : फेसबुकवरील विविध शॉपिंग कंपनीद्वारे ऑनलाईन धारदार व घातक शस्त्रांची विक्री होत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी केला. अशा शॉपिंग कंपनी व ऑनलाईन साईडवर बंदी आणण्याची मागणी निवेदनाद्वारे सायबर सेलकडे निवेदनाद्वारे केली.शहरातील समाजसेवक वकील प्रशांत चंदनशिव यांच्याकडे फेसबूकवरील काही शॉपिंग कंपनीद्वारे घातक व धारदार शस्त्रांची विक्री घरपोच करीत असल्याची माहिती काही मित्राकडून मिळाली. त्यांनी याबाबत ऑनलाईन सविस्तर माहिती काढली असता, चाकू, तलवार, गुप्ती आदी धारदार शस्त्र ऑनलाईन द्वारे मिळत असल्याची खात्री झाली. अश्या घरपोच शस्त्रामुळे सर्वत्र गुन्हेगारी वाढली असून हे देशास व समाजास घातक आहे. चंदनशिव यांनी मित्रांसह पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे धाव घेऊन ऑनलाईन शस्त्र विक्री बाबत सोमवारी माहिती दिली. अशा शस्त्रविक्री शॉपिंग कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त मोहिते यांनी झटपट कारवाई साठी सायबर सेलकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी सायबर सेलकडे कारवाई बाबत ऑनलाईन तक्रार केल्याची माहिती दिली आहे.
फेसबुक वरील काही शॉपिंग कंपन्या ऑनलाईन शस्त्र विक्री करीत असल्याने, त्या कंपन्यावर कारवाई करून यापूर्वी विक्री केलेले घातक शस्त्र जप्त करण्याची मागणी अँड प्रशांत चंदनशिव यांनी सायबर सेलकडे निवेदनाद्वारे केली. प्रशांत चंदनशिव यांच्या या कामाचे शहरातून कौतुक होत असून पोलीस व सायबर सेलच्या करवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.