केवळ ३५ हजारांना मुंबईतील महिलेला सौदीत विकले; सीबीआयकडे तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 15:37 IST2018-12-24T15:26:56+5:302018-12-24T15:37:55+5:30
काही महिन्यातच महिलेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी तिला ३५ हजार रुपयांना विकत घेतले असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यांनतर याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

केवळ ३५ हजारांना मुंबईतील महिलेला सौदीत विकले; सीबीआयकडे तपास
मुंबई - मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला घरकाम करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या रोजंदारीवर सौदी अरेबिया या आखाती देशात पाठविण्यात आले होते. केरळ येथील एजंटने तिला सौदी अरेबिया येथे एका कुटुंबीयांकडे त्यांचे घरकाम करण्यासाठी पाठविले होते. मात्र, काही महिन्यातच महिलेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी तिला ३५ हजार रुपयांना विकत घेतले असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यांनतर याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
परदेशात जास्त पगाराची नोकरी मिळावी म्हणून मुंबईतील एक महिला नोकरी शोधात होती. तिच्या संपर्कात केरळातील एक परदेशात पाठवणार एजंट आला. सजोय असं या एजंटचा नाव असून त्याने तिला २५ हजार दरमहा अशी नोकरी लावतो सांगितले. पुढील प्रक्रियेसाठी तिच्याकडे एजंट १५ हजार रुपये मागितले. त्यानंतर त्या महिलेने १५ हजार रुपये सजोयला दिले. तसेच तिने पासपोर्ट देखील सुपूर्द करत व्हिसाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. १ एप्रिल २०१६ दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर महिलेने परदेशातील नोकरीबाबत विचारणा केली असता ६ एप्रिल २०१६ रोजी सजोयचा मित्र मुजीबने त्या महिलेला सौदीमध्ये घरकामासाठी पाठविले. मात्र, सौदीतील त्या कुटुंबाकडून संबंधित महिलेला ठरलेला २५ हजार पगार मिळत नव्हताच तसेच तिच्याकडून त्या कुटुंबातील घरकामाबरोबरच इतर कामं देखील करून घेतली जात होती. याबाबत एजंट सजोयला तिने कळविले. त्यावर त्याने दुसऱ्या नोकरीबाबत कळालं की सांगतो असं सांगून टोलवाटोलवी करत होता. मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने सौदीतील कुटुंबियांना ठरलेला पगार देत नसल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्या कुटुंबाने आम्ही तुला ३५ हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने पीडित महिलेने नोव्हेंबर २०१६ ला मुंबई गाठली. याप्रकरणी केरळ पोलिसांकडून तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला असून सीबीआयने मानव तस्करीचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. सजोय, मुजीबसह अन्य साथीदारांचा सीबीआय शोध घेत असून या टोळींना अनेक भारतीयांना परदेशात नोकरीला लावतो सांगून फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.