गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिहानी गेट पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीने ५ जुलै रोजी डेटिंग एपवर अकाऊंट तयार केलं. मुलीला त्याच दिवशी चांगलं प्रोफाइल असलेला एक मुलगा आवडला. तिने त्याच्याशी चॅटींग करायला सुरुवात केली, मुलगा नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतो हे कळल्यावर तिला खूप आनंद झाला. पुढे मैत्री वाढू लागली.
मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आकाश अग्रवाल नावाच्या मुलासोबत मैत्री झाली. त्याने NSA मध्ये चीफ डेटा एनालिस्ट म्हणून काम करत असल्याचं सांगितलं. ९ जुलै रोजी आम्ही दोघे पहिल्यांदा कॉलवर बोललो. अचानक त्याचा फोन आला. मला प्रमोशन मिळणार आहे त्यामुळे माझा पगार १० जुलैपर्यंत फ्रीज करण्यात आला आहे, असं सांगितलं. थोडे पैसे पाठवशील का? असं विचारलं. मी ८५०० रुपये पाठवले. दुसऱ्याच दिवशी १९६० रुपये ट्रान्सफर केले.
एफआयआरनुसार, जेव्हा मुलीने त्याला भेटायला सांगितलं तेव्हा त्याने पंतप्रधान आज त्यांच्या कार्यालयात येणार असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी भेटू. दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवल्यावर कालचा प्रमोशनचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं म्हणाला. त्यासाठी ४० लाख रुपये खर्च येणार आहे. हे ऐकून मी दोन लाख रुपये पाठवले. त्यानंतर तो म्हणाला की, ऑपरेशन झालं आहे, पण ६ लाखांची कमतरता आहे, म्हणून मी साडेतीन लाख रुपये ट्रान्सफर केले.
मुलीने अशा प्रकारे २४ लाख रुपये पाठवले. पण एक दिवस अचानक आकाशने माझ्या मोबाईलवर अश्लील चॅट आणि फोटो पाठवले. काही दिवस मी त्याच्याशी बोलणं बंद केलं. जेव्हा पुन्हा बोलणं सुरू झालं तेव्हा त्याने आईचं निधन झाल्याचं सांगितल. अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत. मग काही वेळाने फोन आला की वडिलांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर ५० हजार रुपये पाठवले असं तरुणीने म्हटलं आहे. यानंतर तरुणीला संशय आला आणि तिने पोलिसांत धाव घेतली आहे.