नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात हमीरपूर इथं ११ वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. आरोपी आणि मृत मुलगा दोघंही मित्र होते. केवळ ६० रुपयांची उधारी मागितल्यावर १३ वर्षाच्या मित्रानं ११ वर्षीय मुलाची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात १३ वर्षाच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून सध्या या घटनेची पुढील चौकशी आणि कार्यवाही सुरु आहे.
मृतदेहाचे ११ तुकडे
या मुलाचा मृतदेह एका जंगलात आढळला. ११ वर्षीय मुलाचा मृतदेह जंगलातील वन्यप्राणी आणि कुत्र्यांनी खाऊन ११ तुकडे केले होते. जुगारात हरलेले ६० रुपये मागितल्यामुळे ही क्रूर घटना घडली आहे. आरोपीनं पोलिसांच्या चौकशीत हत्या केल्याची कबुली दिली आहे. दोन दिवसांपूर्वी काशीराम कॉलनीनजीक जंगलात क्षिनविक्षिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्याची पोलिसांनी ओळख पटवली.
‘असा’ झाला खुलासा
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असता तेव्हा माहिती मिळाली की, कांशीराम कॉलनीत राहणारा मुलगा मृत मुलाचा जिगरी दोस्त आहे. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असता त्याच्या उडवाउडवीच्या उत्तरावरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने केलेला गुन्हा कबुल केला.
४ महिन्याची मैत्री अन् ४ मिनिटांत हत्या
अल्पवयीन आरोपीने पोलीस जबाबात म्हटलं की, जवळपास ४ महिन्यापूर्वी आमची मैत्री झाली होती. एकेदिवशी सामान आणण्यासाठी घरच्यांनी ६० रुपये दिले होते. ते मी मित्रांसोबत जुगारात हरलो. घरात सामान घेण्यासाठी मी माझ्या मित्राकडून ६० रुपये उधारी घेतली होती. पैसे परत मागताना तो शिवीगाळ करु लागला. तेव्हा मी त्याला जंगलाच्या दिशेने नेले. तिथे माझ्यासोबत तो भांडण करु लागला. तेव्हा मी त्याला ढकलून खाली पाडलं त्याने बाजूचा दगड घेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला परंतु मी तसं होऊ दिलं नाही. मी त्याच्या हातातून दगड खेचून त्याच्या डोक्यात मारला तेव्हा तो रक्तबंबाळ झाला.
झाडात लपवला मृतदेह
तसेच त्यानंतर मी त्याला घनदाट जंगलातील झाडामागे लपवलं. त्यावेळी त्याचा श्वास सुरु होता. दगड नाल्यात फेकून दिला. त्याच नाल्यातील पाण्याने मी कपड्यांना लागलेले रक्त धुवून टाकलं आणि घरी निघून गेलो. हमीरपूर एसपी कमलेश दीक्षित म्हणाले की, या प्रकरणात आरोपीवर कायद्यानुसार कारवाई होईल. आरोपीला सुधारगृहात पाठवलं जाईल असं सांगितले आहे.