लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ॲमेझॉनतर्फे गिफ्ट मिळत असल्याची लिंक एका व्यक्तीला पाठवून साडेसहा लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या सायबर सेल पथकाने आरोपी रियाजउद्दीन अब्दुल सुभान अहमद (२६) याला वरळीत अटक केली. कारवाईदरम्यान या आरोपीच्या बँक खात्यातील १ कोटी ३६ लाख रुपये गोठवण्यात त्यांना यश मिळाले असून आरोपीने पाठवलेल्या टेलीग्राम लिंकचा आयपी ॲड्रेस जपानचा असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपी अहमद हा वरळीच्या गोपाळनगरमधील गोपाळ चाळीत राहत असून, मूळचा आसामचा रहिवासी आहे. जोगेश्वरीत राहणारे इस्माईल नूरमोहम्मद शेख (३०) याला ३० जुलै रोजी अनोळखी क्रमांकावरून व्हाॅट्सॲप मेसेज प्राप्त झाला. त्यात ॲमेझॉन १५० रुपयांचे गिफ्ट देत असून नमूद लिंकवर क्लिक करायला सांगितले. गिफ्ट लागल्याच्या मोहात शेख याने लिंक क्लिक करताच वैराग सेनथील या नावाचे टेलिग्राम अकाऊंट सुरू झाले आणि १५० रुपये शेखच्या पेटीएम खात्यात जमा झाले.
शेख जाळ्यात अडकल्याचे लक्षात घेत भामट्याने शेखला दुप्पट फायद्याचे आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. शेख भामट्याशी बोलण्यात फसले व त्याने ६ लाख ७५ हजार गमावले.
ऑनलाइन लुटीची ‘जपान लिंक’या गुन्ह्याचा तपास परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि ओशिवरा पोलिस ठाण्याचे वपोनि मोहन पाटील, पोनि शिवाजी भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, हवालदार अशोक कोंडे, अंमलदार विक्रम सरनोबत, अनिल पाटील यांनी तपास केला. अटक आरोपीचे मोबाइल, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, चेक बुक, पासबुक, आधार कार्ड व पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून आरोपीने ऑनलाइन लुटण्यासाठी वापरलेल्या लिंकचा आयपी ॲड्रेस जपानचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.