पुसद (यवतमाळ) : बहिणीच्या नावे भावाने बनावट बॅंक खाते उघडून, धनादेशावर बहिणीची खोटी सही करून तब्बल २७ कोटी रुपयाने फसवणूक केली. विशेष म्हणजे भावाच्या या कटात बॅंक मॅनेजर, कर्मचाऱ्यांसह एकंदर नऊ जण सामील होते. नंदकिशोर जुगलकिशोर जयस्वाल (४३), रश्मी नंदकिशोर जयस्वाल, रवी जयस्वाल, सदाशिव नाना मळमणे, लक्ष्मीकांत चौधरी, रवी धुळधुळे, राजू कांबळे अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यांच्यासह अकोला जनता कमर्शिअल बॅंकेच्या पुसद शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि तत्कालीन लेखापाल या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयस्वाल यांची बहीण जयश्री अजयकुमार मोरय्या (४५) (रा. कालीप्रसाद दरोगा प्लाॅट, राजापेठ अमरावती) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे पुसदमध्ये राहणारे भाऊ जयस्वाल यांनी बॅंक व्यवस्थापकाला हाताशी धरुन बनावट दस्ताऐवजाद्वारे मोरय्या यांचे अकोला जनता कमर्शिअल बॅंकेत खाते उघडले. त्यानंतर २०१५ पासून जयस्वाल यांनी होलसेल विक्रेत्याकडून माल खरेदी करून विक्री केला. या व्यवहारापोटी बॅंक खात्याचा आधार घेवून, धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करुन तब्बल २७ कोटी २५ लाख ३४ हजार ८६६ रुपयांनी मोरय्या यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जयश्री मोरय्या यांनी पुसद येथे धाव घेऊन वसंतनगर पोलीस ठाण्यात १२ जुलै रोजी फिर्याद दाखल केली. वसंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री नऊ आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४०८, ४२०, ४२४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अ, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार रवींद्र जेधे करीत आहेत.