लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ऑपरेशन ‘डी गँग’ अंतर्गत सलग चौथ्या दिवशी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित सदस्यांकडे चौकशी करण्यात आली. तर, दुसरीकडे या ऑपरेशनमुळे दाऊदची जवळची मंडळी अंडरग्राउण्ड होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये त्याचा भाचा अलीशाह पारकर हादेखील पत्नी आणि मुलीसोबत दुबईत गेला असून, तेथेच स्थायिक होण्याच्या तयारित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
देशभरात दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोटांचा कट दाऊद टोळीने आखला होता. लष्कर-ए-तोयबा, अल कायदा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या साहाय्याने हे स्फोट घडवून आणण्यासाठी दाऊद टोळीने मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे मुंबईतून पैसा उभा करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. एनआयएकडून मुंबई ठाण्यात २९ ठिकाणी छापेमारी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. एका महिलेसह २४ वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. याबाबत ईडी आणि आयबीकडूनही अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे ‘डी गँग’चे धाबे दणाणले आहेत. काही जण अंडरग्राउण्ड होत आहे. मात्र, यंत्रणा सर्वांवर लक्ष ठेवून आहे. चौकशीच्या ससेमिरामुळे हसीना पारकरचा मुलगा अलीशाह हा मुंबई सोडून दुबईत गेला आहे. सुरुवातीला दुबईतून उमराह करण्यासाठी सौदी अरेबिया आणि तुर्कीला गेला. तेथून पुन्हा दुबईत येत, तेथेच स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.
यामुळे दुबईत स्थायिक होण्याचा निर्णयnगेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊद संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्याची चार तास चौकशी केली होती. त्यापाठोपाठ २०१४ मध्ये हसीना पारकर उर्फ हसीना आपाच्या निधनानंतर त्याच्या अडचणी वाढ होत गेल्याच्या दिसून आले. २०१७ मध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली. त्यानंतर, २०१९ मध्ये इक्बालचा मुलगा रिझवान कासकरला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ईडीने मनी लॉंड्रिंगचा गुन्ह्यात फेब्रुवारीमध्ये इक्बालला अटक केली. इकबाल डी गॅंग चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. खंडणीतून येणारे पैसे टेरर फंडिंगसाठी वापरली जात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. वाढत्या अडचणीमुळे अलीशाहने दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.