- नरेश डोंगरे नागपूर - व्यापाऱ्याचे अपहरण आणि खंडणी वसूल करून गुजरात तसेच राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या, तसेच या दोन्ही राज्यांच्या पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेल्या राजस्थानमधील एका खतरनाक गुन्हेगाराच्या मुसक्या बेलतरोडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी सिनेस्टाईल आवळल्या.परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वात बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सिनेस्टाईल ‘ऑपरेशन किडनॅपर्स’ यशस्वी करून अपहरणकर्त्याला जेरबंद केले. त्याने खंडणीपोटी उकळलेल्या रकमेतील २२ लाखांची रोकडही जप्त केली. मनोज नंदकिशोर व्यास (वय ३४, रा. रामगड, जि. शिखर) असे त्याचे नाव आहे. तो राजस्थानमधील हिस्ट्रिशिटर गुन्हेगार आहे.
मनोज व्यासने त्याच्या ४ साथीदारांसह गांधीधाम गुजरातमधील टिंबर व्यापारी मुकेश अग्रवाल यांचे १९ जानेवारीला अपहरण केले. त्यांना राजस्थानमधील फतेपूर जिल्ह्यात नेले. तेथे त्यांना ओलीस ठेवून जिवे मारण्याचा धाक दाखवला. सुटकेसाठी अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून ३५ लाखांची खंडणी उकळली.दरम्यान, या अपहरण आणि खंडणी वसूल कांडाने गुजरात आणि राजस्थानमध्येही प्रचंड खळबळ उडाली. दोन्ही राज्याच्या पोलिसांसोबत दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) सक्रिय झाले. गुजरात एटीएसने आरोपी मनोज व्यासच्या चार साथीदारांना अटक केली. मात्र, अत्यंत धूर्त गुन्हेगार असलेल्या आरोपी मनोजने गुजरात- राजस्थानच्या तपास यंत्रणेसह सर्वांना गुंगारा देऊन पळ काढला.
असे सुरू झाले ऑपरेशन...
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे आणि कच्छ-गांधीधामचे पोलीस अधीक्षक मयूर पाटील एकाच बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. त्यामुळे त्यांनी डॉ. शिंदेंना आरोपीचे वर्णन आणि संपर्क क्रमांक कळवला. आरोपीचे मोबाईल लोकेशन आज दुपारी ३ नंतर नागपुरात दिसल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत. पीएसआय विकास मनपिया, एनपीसी गोपाल देशमुख, रमेश रुद्रकार, मनोज साहू आणि तेजराम देवढे यांनी अत्यंत शिताफीने सापळा लावून जबलपूर - हैदराबाद हायवेवर किडनॅपर मनोज व्यासला सिनेस्टाईल जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून आय-१० कार तसेच २२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
गुजरात पोलिसांना गुड न्यूजपोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, ठाणेदार आकोत यांच्या या प्रशंसनीय कामगिरीचे सर्वत्र काैतुक होत आहे. येथील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गुजरात पोलिसांनाही आरोपी मनोज व्यासला अटक केल्याची गुड न्यूज देण्यात आली आहे. लवकरच तेथून पोलीस पथक नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती आहे.