पिंपरी - रेल्वे आरक्षण तिकीट खिडकीजवळ तासन्तास रांगेत थांबूनही प्रवाशांना तिकीट मिळत नाही. याउलट बनावट आयडीचा वापर करून अवैध पद्धतीने ई-तिकिटे मिळवून जादा मोबदला घेऊन विक्री करणारा एक दलाल रेल्वे पोलीस बलाच्या (आरपीएफ) जाळ्यात अडकला आहे. अनिल अशोक शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा दलालांचे रॅकेट मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून ‘आॅपरेशन स्टॉर्म’च्या माध्यमातून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मोहीम रेल्वे सुरक्षा बलाने हाती घेतली आहे.पर्यटन हंगाम आणि दिवाळीच्या कालावधीत बनावट आयडीद्वारे मोठ्या प्रमाणावर दलाल अवैधरित्या रेल्वे तिकिटांचा गैरव्यवहार करू लागले आहेत. दलालाकडून एका तिकिटामागे साडेतीनशे रुपये जादा रक्कम उकळली जाते. साधारण पाचशे रुपयांच्या तिकिटासाठीसुद्धा दलालाला साडेतीनशे रुपये द्यावे लागतात. ऐन दिवाळीच्या काळात दलांलाकडून प्रतितिकीट प्रवाशांकडून तब्बल दोन हजार रुपये याप्रमाणे दामदुप्पट, चौपट रक्कम उकळली जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने संपूर्ण देशभर आॅपरेशन स्टॉर्म नावाने मोहीम हाती घेतली असून, देशातील प्रमुख १०० शहरांमध्ये कारवाईस सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील एक दलाल जाळ्यात अडकला असून, असे अनेक दलाल शहराच्या विविध भागांत ट्रॅव्हल्स एजन्सीची दुकाने थाटून बसले आहेत.सर्वसाधारणपणे १२० दिवस अगोदर रेल्वे तिकिटाचे आॅनलाइन आरक्षण करता येते. एका आयडीवरून केवळ सहा जणांचे तिकीट बुकिंग करता येते. तत्काळ आॅनलाइन तिकीट काढायचे असेल, तर एका आयडीवरून चार जणांच्या नावे तिकीट बुक करता येते.रेल्वेच्या आयआरटीसी या संकेतस्थळावरून आॅनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. एकाच वेळी देशाच्या विविधभागातून आॅनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग होत असल्याने सामान्य प्रवाशांना अशा प्रकारे तिकीट बुकिंग करणे शक्य होत नाही. दलालांनी शक्कल लढवून बनावट आयडी तयार करून त्यांच्या नावे जलद पद्धतीने रेल्वे तिकिटे बुकिंग करण्याची पद्धती अवलंबली आहे.खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीची चौकशीआरक्षण यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी रेल्वेने काही एजन्सी नेमल्या आहेत. त्याद्वारे रेल्वे आरक्षण खिडकीशिवाय अन्य ठिकाणी ई-तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र रेल्वेने नेमणूक न केलेले अनेक दलाल अवैधरीत्या रेल्वे प्रवाशांना जादा दराने ई-तिकीट देऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करीत आहेत. हा गैरप्रकार रोखण्याची मोहीम रेल्वे सुरक्षा बलाने देशपातळीवर हाती घेतली असल्याने अनेक दलाल जाळ्यात अडकत आहेत. रेल्वे तिकिटांचे बुकिंग करून देणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील ट्रॅव्हल्स एजन्सीवाल्यांची कसून चौकशी केली जाणार आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रवाशांची लुबाडणूकएका दलालाकडे सुमारे ५० हून अधिक बनावट आयडी आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तासन्तास रांगेत थांबूनही रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर तिकीट मिळत नाही. हतबल झालेल्या प्रवाशांपुढे नाईलाजास्तव दलाल हाच तिकीट मिळविण्याचा पर्यायउरतो. अडचणीत सापडलेल्या या प्रवाशांची दलालांकडून अक्षरश: लुबाडणूक होत आहे.