दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील ठेपणपाडा येथे अफूच्या शेतीचा दिंडोरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून सुमारे 8 लाखाची अफू जप्त करत करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली. दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा येथे अफूची शेती असल्याची गुप्त बातमी दिंडोरी पोलिसांना समजताच रविवारी सकाळी पोलिसांनी ठेपणपाडा शिवारातील शेत गट नंबर 22 मध्ये छापा टाकत तेथे विनापरवाना बेकायदा स्वतच्या फायदयासाठी अफु या अमली पदार्थाच्या झाडाची लागवड केल्याचे आढळून आले. सदरील शेतातील सर्व अफू दिंडोरी पोलिसांनी जप्त केला आहे.
पांढऱ्या प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये वेगवेगळया वजनाच्या एकुण 43 गोण्या हिरवी अफुची झाडे मुळासकट भरण्यात आले होते. एकूण 803 किलो वजनाची सुमारे 8 लाख किमतीचा अफु दिंडोरी पोलिसांनी जप्त करून पोलीस बाळकृष्ण पजई यांच्या फिर्यादीवरून अंमली व औषधीद्रव्य मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 18 प्रमाणे शेतमालक कांतीलाल उर्फ रामचंद्र गोविंद ठेपणे (वय.38 ,) रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, जि.नाशिक तसेच दिपक लालसिंग महाले याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस बाळकृष्ण पजई, एस.पी.धुमाळ आदी तपास करीत आहेत.