पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी चौघा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे़. गणेश सतीश जाधव (वय २०, रा़ कासेवाडी, भवानी पेठ) याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात घरफोडी, दरोड्याची तयारी व बेकायदेशीर जमाव जमवून जातीत तेढ निर्माण करणे यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत़. घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला ८ महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती़. ती भोगून तो परत आल्यानंतरही त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही़. कासेवाडी भागात त्याने दहशत निर्माण केली आहे़. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता़. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी त्याची पडताळणी करुन त्याला एक वर्ष तडीपार केले आहे़. शुभम बाळासाहेब हनमघर (वय २०, रा़ रामनगर, वारजे माळवाडी) या सराईत गुन्हेगाराला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले़. हनमघर याच्यावर शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, मारामारी करणे असे गंभीर गुन्हे वारजे व पौड पोलीस ठाण्यात दाखल आहेत़. या परिसरात त्याची दहशत असल्याने पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी त्याला २ वषार्साठी तडीपार केले आहे़. टोळीप्रमुख किशोर शंकर मोरे (वय २६, रा़ डायसप्लॉट, गुलटेकडी) आणि टोळी सदस्य आकाश गोविंद गायकवाड (वय २०, रा़ गोलघर, पर्वती दर्शन) या दोघांना पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे़. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गुन्हेगारी टोळीतील हे दोघे एकत्रित व वैयक्तिक गुन्हे करत होते़. त्यांच्याविरुद्ध मारहाण करणे, धमकी देणे, जबरी चोरी, प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे आहेत़. या परिसरात त्यांची दहशत असल्याने दोघांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहेत़.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुण्यातून चार सराईत गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 4:27 PM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चौघा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे़.
ठळक मुद्देघरफोडी, दरोड्याची तयारी व बेकायदेशीर जमाव जमवून जातीत तेढ निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल