मुंबई - बनावट वॅक्सीन ड्राईव्ह कॅम्प लावणाऱ्या सहाजणांच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच लस पुरवठा करणाऱ्यास मध्य प्रदेशातूनअटक करण्यात आली आहे.
दहा दिवसापूर्वीच कांदिवली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ३० मे रोजी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये काही लोकांनी वॅक्सीन ड्राईव्हच्या नावाखाली ३९० लसीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यांना दहा दिवसाच्या नंतर वेगवेगळ्या रुग्णालयातून सर्टिफिकेट मिळाले. या वॅक्सीन ड्राईव्हकरीत पालिका प्रशासनाची परवानगीही घेण्यात आलेली नव्हती. तसेच वॅक्सीन ड्राईव्हच्या नियमांचे पालनही करण्यात आलेले नव्हते. तर लोकांना मेडिकल सुविधाही देण्यात आलेल्या नव्हत्या. यामुळे लोकांना संशय आला त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. कांदिवली पोलिसांनी एक आठवड्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपीपैकी पाच आरोपींना अटक केलेली आहे. सोसायटीच्या लोकांना देण्यात आलेले वॅक्सीन हे परवानगी असलेल्या रुग्णालयातून देण्यात आलेले नव्हते. वॅक्सीन हे सीलबंद नव्हते. पोलिसांनी तपस सुरु केल्यानंतर चार आरोपींना अटक केली.
यात एक डॉक्टर आणि एक आरोपी जो वॅक्सीन आणत होता आणि घेऊन जात होता. त्याला मध्यप्रदेश येथून पोलिसांनी अटक केली. सदरचे वॅक्सीन ड्राईव्ह रॅकेट महेंद्र सिंह नामक व्यक्ती चालवित असून तोच मास्टरमाइंड आहे. अशा प्रकारचे उपक्रम हा आरोपी तीन वर्षांपासून आयोजन करीत आहे. महेंद्र सिंह हा दहावी नापास असून अशा प्रकारचे वॅक्सीन ड्राईव्ह उपक्रमाचे आयोजन करीत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या रॅकेटने आतापर्यंत ९ ठिकाणी अशा प्रकारचे वॅक्सीन ड्राईव्ह उपक्रम आयोजित केले आहेत. कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल सहा आरोपींच्या विरोधात भादंवि कलम 420,268,270,274,275,276,419,465,467,468,470,471,188,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये फसवणूक, आईटी कायदा अडीच समावेश आहे. पोलिसांनी लसीकरणादरम्यान रॅकेटने बँकेत ठेवलेली ९ लाखाची रक्कम जप्त करण्याची कारवाईही केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.