मुंबई : सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा कट असल्याची माहिती याच प्रकरणात पुण्यातून अटक केलेल्या मनोज मुदलियारच्या चौकशीतून समोर आले. मंगळवारी मुदलियारसह याच प्रकरणात अटकेत असलेले अजित मगरे, संदीप गोडबोले यांना वाढीव कोठडीसाठी गिरगाव न्यायालयात हजर केले होते. गिरगाव न्यायालयाने तिघांनाही २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिली की, मुदलियार हा सिल्व्हर ओकच्या हल्ल्यापूर्वी झालेल्या ७ तारखेच्या बैठकीत सहभागी होता. त्याने सहकाऱ्यांच्या सहाय्याने सिल्वर ओकची रेकी केली. त्यानंतर हे आंदोलन केले. यासोबतच गोडबोले आणि मगरेच्या वाढीव कोठडीची मागणी केली. आरोपींना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान आहे. या आरोपींचा आणखी काही लोकांवर हल्ला करण्याचा प्लॅन असल्याचीही माहिती त्यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे तिघांकडे अधिक चौकशी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी वाढीव कोठडीच्या मागणीला विरोध करत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही युक्तिवादानंतर गोडबोले आणि मगरेच्या कोठडीत वाढ करत तिघांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.
सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा रचला हाेता कट; पुण्यातून आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 6:46 AM