- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यातील ट्रॅक्टर चोरून परराज्यात त्यांची विक्री करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असून राजस्थानमधून अटक केलेल्या रशिद खाँ उर्फ मास्टर याच्या वेगवेगळ््या बयानातून ट्रॅक्टर चोरीच्या रंजक कथा समोर येत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील पोलिस ठाण्यात रशिद खाँ उर्फ मास्टरने चोरी केलेली १५८ ट्रॅक्टर जमा करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्र देत आहे. आरोपीनेच ही माहिती दिली असल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, अटकेतील हा आरोपी सराईत गुन्हेगार असून ट्रॅक्टर चोरी प्रकरणात पोलिसांनी आतापर्र्यंत सहा जणांना अटक केलेली असून त्यातील दोन आरोपी हे राजस्थानमधील आहेत. दरम्यान, अटकेतील या आरोपींना आता विविध प्रकरणांच्या तपासात जिल्ह्यातील पोलिस ठाणे तथा जळगाव खान्देश जिल्हयातील जामनेरसह अन्य पोलिसांच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून जिल्ह्यातील ट्रॅक्टर चोरी करून एका कंटेनरद्वारे ते राजस्थान, हरियाणा या राज्यात नेले जात होते. मात्र अंढेरा येथील सुभाष राठोड यांचे ट्रॅक्टर चोरी झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात स्थानिक ठाणेदार विनायक कारेगावकर यांनी चोरीच्या ट्रॅक्टरच्या तपासात मार्गावरी सीसीटीव्ही फुटेज तपासून प्रकरणातील स्थानिक आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून हे परराज्यात चोरीचे ट्रॅक्टर विक्री करणारे रॅकेट उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा मास्टर माईंड रशिद खाँ उर्फ मास्टर सध्या पोलिस कोठडीत असून २१ जुलै रोजी त्याची पोलिस कोठडी संपणार आहे.गुन्ह्यातील मुख्य आरोपी रशिद खाँ फारसे काही बोलत नसला तरी राज्यस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील तो रहिवाशी आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने अंढेरा पोलिसांनी हा तपास केला आहे. प्रकरणात पोलिसांनी थेट राजस्थानातून चोरीचा ट्रॅक्टर व ते वाहून नेणारे कंटेनर व त्याचा चालक यांनाही ताब्यात घेतलेले आहे. दुसरीकडे रशिद खाँ याच्या सांगण्यानुसार उत्तरप्रदेशातील मथुरा येथील पोलिस ठाण्यातही त्याने चोरी केलेली १५८ र्टॅक्टर पोलिसंनी जमा केली आहेत. यात महाराष्ट्रातील ट्रॅक्टरचा समावेश आहे किंवा नाही ही बाब स्पष्ट झालेली नसली तरी मथुरा येथील पोलिस ठाण्यात १५८ ट्रॅक्टर स्थानिक पोलिसांनी जमा केली असल्याबाबत अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनायक कारेगाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.