पूनम अपराज
मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी आतापर्यंत २५ पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस आयुक्त सोनाली ढोले या करत आहेत. प्रकरण संवेदनशील असल्याचं तपासात गुप्तता राखली जाणं स्वाभाविकच आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या अब्रूशी नराधम २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर असा ९ महिने खेळत होते, कधी गुंगीचे औषध देऊन, हुक्का देऊन तर कधी दारू पाजून नराधमांनी मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढले. अंगावर काटा आणणारी ही डोंबिवलीतील घटना आहे. मात्र, ही ९ महिने सुरु असलेली हृदयद्रावक घटना मे महिन्यातच रोखता आली असती. पण आरोपींनी पीडितेला पोलिसांना काही सांगितल्यास मारून टाकेन अशी धमकी दिली होती.
५ ते ६ मे दरम्यान पिडीतेसोबत घडलेल्या घटनेची माहिती अशी की, ५ मे २०२१ रोजी कॉल करून पीडितेला प्रियकराच्या मित्राने ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी बोलावले. त्यास तिने नकार दिल. नंतर तिला एक मित्र तिच्या घरी आला आणि त्याने प्रियकरासोबत काढलेला अश्लील व्हिडीओ तिच्या घरी दाखवेन अशी धमकी दिली. नंतर घाबरून पीडित मुलगी त्या मित्रांसोबत पडक्या चाळीत घेऊन गेले आणि हुक्का ओडायला दिला. त्यानंतर तिला हुक्क्याची नशा चढलेली असताना ५ ते ६ जणांनी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दुसरा मित्र तिला एका मित्राच्या घरी घेऊन गेला आणि तिथेही नराधमांनी तिच्या अब्रूचे लचके तोडले. त्यानंतर तिला ५ मेला घरी न जाऊ देता रात्री १०.३० च्या सुमारास दोन मित्र कारमधून दूरवर घेऊन गेले आणि तिथे बेडरूममध्ये नेऊन त्यांनी सामूहिक बलात्कार केला.
आपली मुलगी संपूर्ण दिवस आणि रात्री देखील परत घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ मेला आईने मानपाडा पोलीस ठाण्यात पीडित मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ६ मे रोही दुपारी ३ वाजता पीडितेला घरी आणून सोडले आणि पोलिसांना काही सांगू नकोस जर सांगितले तर तुला मारून टाकेन अशी त्यांनी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात या क्रूर कृत्याबाबत वाच्यता केली नाही. नाहीतर पुढे ३ महिने झालेला अत्याचारास आळा बसला असता.