भुवनेश्वर : इतर लोकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात सिम मिळवून त्यांचे ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांसह इतरांना विकल्याप्रकरणी ओडिशात रविवारी तीन जणांना अटक करण्यात आली. राज्य पोलिसांच्या विशेष कृतिदलाने (एसटीएफ) नयागड व जाजपूर जिल्ह्यात ही कारवाई केली. पठाणीसमंत लेंका (३५), सरोजकुमार नायक (२६) व सौम्या पट्टनाईक (१९) अशी आरोपींची नावे आहेत. लेंका आयटीआय शिक्षक म्हणून काम करतो.
हे तिघे इतरांच्या नावावर मोठ्या प्रमाणात सिम खरेदी करून, पाक गुप्तचर यंत्रणा किंवा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या, त्याचप्रमाणे भारतातील हस्तकांसह विविध लोकांना ओटीपी (सिम वापरून लिंक केलेले/जनरेट केलेले) विकत होते. त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत.
नंबर भारतीयांचे, वापरायचे पाकिस्तानीभारतातील मोबाइल क्रमांक अशा उद्देशांसाठी वापरले जात असल्याने, लोकांना असे वाटेल की, ही खाती भारतीयांच्या मालकीची आहेत, परंतु ती प्रत्यक्षात पाकिस्तानमधून चालविली जातात.
असा केला जातो गैरवापरओटीपीद्वारे उघडण्यात आलेल्या खात्याचा वापर हेरगिरी, दहशतवाद्यांशी संवाद, फुटीरतावादी भावनांना उत्तेजन देणे, सेक्सटॉर्शन आणि हनी-ट्रॅपिंग यांसारख्या विविध कारवायांसाठी केला जातो. ही खाती भारतीय मोबाइल नंबरशी लिंक केलेली असल्याने लोकांना ती विश्वासार्ह वाटतात. शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उघडलेल्या खात्यांचा वापर दहशतवादी व भारतविरोधी घटकांना वस्तू पुरविण्यासाठी केला जातो.