अमरावती : कार्यालयीन सहकारी महिलेशी अश्लिल भाषेत बोलून तिच्यावर टॉन्टिंग करण्यात आली. तथा तिला शरीरसंबंधांची मागणी करण्यात आली. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शासकीय कार्यालयात ३ मे रोजी सायंकाळी घडली. मात्र, त्यानंतरही त्या वरिष्ट पुरूष सहकाऱ्याच्या वृत्तीत तसूभरही फरक पडला नाही. त्यामुळे त्या महिलेने महिनाभरानंतर गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी विजय पुंडलिकराव कविटकर (४५, रा. चैतन्य कॉलनी) याच्याविरूध्द ३ जून रोजी विनयभंग व ॲट्रासिटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
फिर्यादी महिला व आरोपी विजय कविटकर हे एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, आरोपी विजय हा नेहमीच त्या कार्यालयीन सहकारी महिलेशी शारीरीक लगट करतो. येता जाता धक्का देतो. अश्लिल भाषेत बोलून टॉन्टिंग करतो. कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्यास प्रश्नांचा भडीमार करतो. तथा वरिष्टांकडे कसुरी अहवाल पाठवून कार्यवाहीची धमकी देत असल्याचे कर्मचारी महिलेने म्हटले आहे. आरोपीच्या अशा बेबंद वागण्याने ती पुरती खचून गेली आहे.
नेमके घडले काय?३ मे रोेजी सायंकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास ती कर्मचारी महिला कार्यालयातून घरी जात असताना स्थानिक न्यायालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरून आरोपीने दुचाकीने पाठलाग केला. तथा थांबवून तिला शारीरिक सुखाची मागणी केली. ती कशीबशी घरी पोहोचली. काय करावे अन् काय करू नये, अशा द्विधावस्थेत तिने त्याच्या वर्तनात फरक पडेल, या आशेपोटी ती शांत राहिली. मात्र, पाणी डोक्यावरून गेल्याने २ जून रोजी रात्री तिने गाडगेनगर ठाणे गाठले. ३ जून रोजी पहाटे १.३२ च्या सुमारास एफआयआर नोंदवण्यात आला.