कोलार: प्राण्यांवर होत असलेले अत्याचार, त्यांनी दिली जाणारी क्रूर वागणूक पुन्हा एकदा समोर आली आहे. कर्नाटकच्या कोलारमध्ये २० माकडांना विष देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माकडांना विष देऊन संपवण्यात आलं. त्यानंतर त्यांचे मृतदेह गोण्यांमध्ये भरून ते फेकून देण्यात आले. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोषींचा शोध सुरू असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. असाच प्रकार जुलैमध्ये हस्सन जिल्ह्यात घडला होता. त्यावेळी ३० माकडं एका गावात मृतावस्थेत आढळून आली होती. तर जवळपास २० माकडं जखमी अवस्थेत सापडली होती.
बेलूर तालुक्यात असलेल्या चोवडानहल्ली गावात हा प्रकार घडला होता. माकडांना आधी विष देण्यात आलं आणि मग त्यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती तपासातून समोर आली. माकडांना मारणाऱ्यांनी त्यांना गोणींमध्ये भरलं आणि त्या चोवडानहल्ली गावाजवळ रस्त्याच्या शेजारी टाकल्या. या गोणी स्थानिक तरुणांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरुणांनी गोणी उघडून पाहिल्या. त्यावेळी काही माकडं श्वास घेताना तडफडत असल्याचं त्यांना दिसलं. मात्र मारहाण झाल्यानं त्यांना हालचालही करता येत नव्हती.