जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचाराचा आलेख सातत्याने वाढत असून, गेल्या सहा वर्षांत असे १ लाख ७ हजार ४४८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी व लैंगिक छळासंबंधी दाखल गुन्ह्यांची ही संख्या असून, प्रत्यक्षात त्याचे प्रमाण दीडपट अधिक असण्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
अत्याचाराच्या बहुतांश घटना एकतर्फी प्रेम व लैंगिक वासनेतून घडल्याचे तपासातून समोर आले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत सजग असल्याची ग्वाही राज्यकर्ते व पोलीस देत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
हिंगणगाव येथे एका विकृताने भर दिवसा प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, निषेध मोर्चे काढले जात आहेत. मात्र, राज्यात सातत्याने अशा घटना घडतच आहेत. त्यांना थोपविण्यात पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याची स्थिती आहे. प्रतिबंधासाठी उपाय योजले जात असूनही, महिला अत्याचारांना त्यामुळे लगाम बसलेला नाही, असे आकडेवारीवरून दिसते.विनयभंगाचे प्रकार सर्वाधिकराज्यात १ जानेवारी,२०१४ ते ३१ डिसेंबर, २०१९ या काळात विनयभंगाचे ७३ हजार ३१ गुन्हे दाखल.याच काळात बलात्काराचे26,512गुन्हे दाखल झाले होते. छेडछाड व हुंडाबळीचे अनुक्रमे ६,४७५ व १,४३० प्रकार घडले असून, त्यातील निम्म्याहून अधिक प्रकरणांचा तपास सुरू आहे.