बीड: बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं कंपनीविरोधात आंदोलन केल्याच्या रागातून कंपनीच्या मालकानं त्याला भयंकर शिक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा परिसरातील एका कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आवाज उठविणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याला कंपनीतीलच काही अधिकाऱ्यांनी विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ३ सप्टेंबरला घडलेल्या घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला.आष्टी तालुक्यातील अंभोरा परिसरात कॅनफॅक्स कंपनी असून, या परिसरातील अनेक कर्मचारी काम करतात. या कंपनीत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध कारणावरून वाद होत असायचे.
संतोष गजानन आमले (रा. अंभोरा, ता. आष्टी) हा या कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता. संतोष याने कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून मिळावे यासाठी कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता. कर्मचाऱ्यांना वेतन वाढवूनही मिळाले. परंतु, याचा राग मनात धरून कंपनीचे मालक सुभाष मुथा यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांमार्फत संतोषवर आरोप करून त्याला कामावरून काढून टाकले.
३ सप्टेंबरला संतोष आमले हा कंपनीच्या समोरील स्वतःच्या शेतात काम करीत असताना कंपनीचे अधिकारी संदीप धोंडीबा सुरवसे, विकास विठ्ठल होले व बापूसाहेब सीताराम गायकवाड हे तिघे त्या ठिकाणी येऊन कंपनीच्या विरोधात आवाज उठवतोस का? असे म्हणत त्यांनी सोबत आणलेले विषारी औषध संतोषला पाजले. यावेळी संतोषने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला असता आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करीत असलेले नातेवाईक संतोषच्या मदतीला धावत येऊन संतोषला नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
११ सप्टेंबरला संतोष गजानन आमले याने दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष मुथा, संदीप सुरवसे, विकास होले व बापूसाहेब गायकवाड यांच्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने हे करीत आहेत.