नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरमयांचा अटकपूर्व जामीन फेटाळून दणका दिला आहे. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. यानंतर तात्काळ चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
दिल्ली हायकोर्टात पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास (अंमलबजावणी संचालनालय) ईडी आणि (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआयनं विरोध दर्शवला होता. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे ईडी आणि सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७ मधील असून त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. सीबीआयने १५ मे २०१७ साली आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती यांना देखील अटक केली होती. सध्या कार्ती चिदंबरम जामिनावर आहेत. मात्र, आज दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे.