मुंबई - निष्कलंक, प्रामाणिक आणि निर्विवाद आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेले राज्याचे विद्यमान पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि विद्यमान पोलीस महसंचालक दत्ता पडसलगीकर उद्या निवृत्त होणार होते. मात्र, त्यांच्या सेवाज्येष्ठतेचा उपयोग करुन घेण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने त्यांना तीन - तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, राज्यात सध्या सुरु असलेली परिस्थिती पाहता पडसलगीकर या मुदतवाढीकरिता नाखूष असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर पडसलगीकरांनी मुदतवाढ नाकारली असती तर त्यांना निवृत्त न होता राजीनामा द्यावा लागला असता, मात्र सलग ३० पेक्षा जास्त वर्ष सेवेत असलेल्या पडसलगीकरांना रीतसर निवृत्त होण्यासाठी निदान राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ स्विकारावी लागणार आहे. त्यामुळेच नाईलाजास्तव पडसलगीकर १ सप्टेंबरपासून वाढीव पदभार स्विकारत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्यात तसेच देशात सध्या नक्षलीविरोधातील कारवाई आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांचे अटकसत्र जोरात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तपास सुरु असताना दत्ता पडसलगीकर यांच्यासारख्या निष्कलंक, प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या अनुभवाचा फायदा घेण्याची विनंती सरकारच्यावतीने करण्यात आली. पडसलगीकर यांच्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त सुबोधकुमार जैसवाल यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पडसलगीकर सध्या सुरु असलेल्या कारवाईमुळे आपल्या निष्कलंक सेवेला कोणताही ठपका लागू नये म्हणून उद्याच निवृत्त होणार अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडसलगीकर उद्या निवृत्त होणार नसून त्यांनी तीन महिन्यांची मुदतवाढ स्विकारली आहे.