जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याच दरम्यान अचानक दिल्लीत आलेल्या एका फोनमुळे सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर आली. काल रात्री दिल्लीपोलिसांना एक आपत्कालीन फोन आला ज्यामध्ये एका व्यक्तीने दावा केला की, त्याला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची आधीच माहिती होती.
हा फोन येताच पोलीस विभाग सक्रिय झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी तात्काळ संबंधित एजन्सींना माहिती दिली. त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. तपास यंत्रणांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण काहीतरी वेगळंच असल्याचं निष्पन्न झालं.
दारूच्या नशेत केला फोन
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फोन करणारा व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि त्याचा दावा पूर्णपणे निराधार असल्याचं आढळून आलं. चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं की त्याने दारूच्या नशेत फोन केला होता. कॉलनंतर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र हा दावा आता खोटा ठरला आहे.
दावा पूर्णपणे निराधार
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची पुष्टी केली आणि म्हटलं की, "तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की त्या व्यक्तीकडे अशी कोणतीही वास्तविक माहिती नव्हती. त्याचा दावा पूर्णपणे निराधार होता आणि तो दारूच्या नशेत करण्यात आला होता."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि त्यानेच हा फोन केला होता. आता त्याच्यावर कारवाई केली जात आहे. सुबोध त्यागी असं या व्यक्तीचं नाव आहे. तो दिल्लीत राहत असून व्यवसायाने टेम्पो-ट्रॅव्हलर ड्रायव्हर आहे.