लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घराच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीनंतर सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीने दोन मुलांसह आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आली आहे. या चिठ्ठीत न्यायव्यवस्थेसह इतरही महत्त्वाच्या व्यक्तींप्रती नाराजी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यसैनिक नारायणदास कामवायनी यांच्या पत्नी मोहिनी (८७) यांनी मुलगा दिलीप (६७) व दिव्यांग मुलगी कांता (६५) यांच्यासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वाशी सेक्टर ४ येथे त्या दोन मुलांसह राहायला होत्या. त्यांचे घरावरून एका परिचयाच्या व्यक्तीसोबत कायदेशीर वाद सुरू होता. या व्यक्तीने ते घर बळकावण्याचा प्रयत्न करून आपल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप मोहिनी यांनी केला होता.
या प्रकरणात उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसह मोहिनी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, नुकसानभरपाईऐवजी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. यासाठी त्या २०१२ मध्ये उपोषणालाही बसल्या होत्या. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशाराही त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दिला होता. २०१६ नंतर हे प्रकरण लांबत गेल्याने मोहिनी यांनी शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन करुन दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला.
मोहिनी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायव्यवस्था व इतर यंत्रणा आपल्याला न्याय देऊ शकल्या नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या जुन्या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. - रमेश चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक, वाशी