इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये एका हिंदू कुटुंबामधील ५ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, ही घटना रहिम यार खान शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या अबुधाबी कॉलनी येथील आहे. रामचंद्र मेघवाल यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांना ठार मारण्यात आलं आहे, ते हिंदू कुटुंबातील होते, मेघवाल यांचा टेलरिंगचं दुकान होतं, या ५ लोकांच्या हत्येमुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा अल्पसंख्याक हिंदू आणि सिख समुदायातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या या कुटुंबातील सर्व सदस्यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानी पोलिसांनी घरातून चाकू आणि कुऱ्हाड जप्त केल्या आहेत. हल्लेखोरांनी चाकू आणि कुऱ्हाडीने ५ लोकांनी हत्या केली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. रामचंद्र मेघवाल यांचे वय ३५-३६ असल्याचं सांगितलं जातं.
रामचंद्र मेघवाल आपल्या कुटुंबासह शांतमय जीवन जगत होते, परंतु हल्लेखोरांना ते रुचलं नाही, हा हल्ला करणारे कोण आणि ही हत्या का करण्यात आली, याबाबत काही स्पष्टता नाही, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे पाकिस्तानातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, पाकिस्तानात हिंदू कुटुंबीयांना टार्गेट बनवणं हे पहिल्यांदाच घडलं असं नाही, तर अनेकदा अशा घटना होत असतात. कधी दुकानं लुटली जातात तर तर कधी आयाबहिणींची इज्जत. अनेकदा धर्मस्थळेही उद्ध्वस्त केली जातात.
ताकदीचा वापर करून धर्म परिवर्तन केले जाते, मात्र इमरान सरकारला या कट्टरपंथीयांना रोखण्यास अपयश आलं आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात अटारीच्या मार्गाने भारतात आलेल्या १०० हिंदू कुटुंबीयांनी पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचारांचं दु:ख सांगितले होते, पाकिस्तानातून आलेल्या या हिंदू कुटुंबात महिला, लहान मुले, युवक युवतींचा सहभाग होता. कट्टरपंथी लोकांनी कशाप्रकारे हिंदू कुटुंबांना पाकिस्तानात जगणं कठीण केलंय हे ते सांगतात. पाकिस्तानात माणुसकी संपली आहे असा आरोपही या कुटुंबीयांनी केला होता.