देवास – मध्य प्रदेशातील देवास येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका घरावर चक्क पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घराच्या मालकाला अटक केली आहे. या प्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, मध्य प्रदेशातील देवास येथील शिप्रामध्ये एका घराच्या गच्चीवर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओ पाहून स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. या व्हिडीओबाबत माहिती जमा करुन पोलीस घटनास्थळी झाले. त्यावेळी घटनास्थळी पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचं दिसून येताच तातडीने पंचनामा करुन पोलिसांनी घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे.
कुठून आला हा झेंडा?
आरोपी घरमालकाचं नाव फारुख खान असं आहे. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जनभावना भडकवण्यासाठी घरमालकाने अशाप्रकारे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करुन झेंडा ताब्यात घेतला आहे. घरमालक आरोपी फारुख खान याच्या मुलाने हा झेंडा फडकावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा झेंडा कुठून आणला आणि कोणी दिला याबाबत पोलीस आरोपीकडून कसून चौकशी करत आहेत.
याबाबत अधिकारी लखनसिंह म्हणाले की, शिप्रा ग्रामपंचायतीमधील एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याची माहिती मिळाली. हा झेंडा घरमालक फारुख यांच्या १२ वर्षाच्या मुलाने लावल्याची माहिती आहे. आम्हाला ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली तात्काळ आम्ही झेंडा उतरुन तो जाळून टाकला. स्थानिक पोलिसांसह महसूल विभागाचे अधिकारीही याची चौकशी करुन तहसिलदारांना अहवाल सादर करणार आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाई करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.