आजकाल ऑनलाईन गेमिंग Apps चा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. अनेकजण तासनतास त्यामध्ये मग्न राहतात. काही हरतात, काही जिंकतात. याच दरम्यान अनेक हटके घटना देखील घडतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. ज्यामध्ये गेमिंग App लुडो (LUDO) खेळत असताना पाकिस्तानमधील एक मुलगी यूपीमधील एका मुलाच्या प्रेमात पडली. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की पाकिस्तानातून सीमारेषेची बंधने झुगारून ती मुलगी थेट भारतात आली.
मुलानेही हिंमत दाखवत मुलीला आपली जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केलं आणि बंगळुरूमध्ये एकत्र राहू लागले. पण आता दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करत भारतात प्रवेश करून वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. मुलीसोबतच या खोट्या प्रकरणात तिच्यासोबत आलेल्या मुलालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय मुलायम सिंह यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो बंगळुरू येथील एचएसआर लेआउट या खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मुलायम आपला बराच वेळ गेमिंग App लुडो खेळण्यात घालवायचा. याच गेमच्या माध्यमातून तो पाकिस्तानातील हैदराबाद येथे राहणाऱ्या 19 वर्षीय इकरा जीवानी या तरुणीच्या संपर्कात आला. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला.
मुलायमच्या सांगण्यावरून 19 वर्षीय पाकिस्तानी तरुणीने सप्टेंबर 2022 मध्ये काठमांडू, नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. मुलगी आणि मुलायम दोघेही बंगळुरूच्या बेलंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेबर क्वार्टरमध्ये राहू लागले. मात्र, त्याचे हे गुपित फार काळ जगापासून लपून राहू शकले नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"