राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून AK-47 बंदूक आणि मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. पूर्व दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अशरफ अली मौलाना म्हणून १० वर्ष भारतात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने UAPA Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी असून, तो मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून AK-47 , काडतूस आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना स्वतः विशेष कक्षाच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते. अस्थाना म्हणाले, “सणासुदीच्या अगोदर विशेष कक्षाने दहशतवादाची एक मोठा कट उधळून लावला आहे.”
या प्रकरणाची अधिक माहिती देताना दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली एक दहशतवादी लक्ष्मी नगरमध्ये लपला आहे आणि येत्या काही दिवसात काहीतरी मोठा घातपात करू शकतो. माहितीच्या आधारे, छापे टाकण्यात आले आणि अलीला सोमवारी रात्री १०च्या सुमारास त्याच्या घरातून अटक करण्यात आली.” या कारवाईदरम्यान तुर्कमन गेट येथील कालिंदी कुंज येथून भारतीय पासपोर्ट, शस्त्रे आणि बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अली ISI या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. अटक करण्यात आलेला दहशतवादी काही दिवस काश्मीरमध्ये राहिल्याचा दावाही करण्यात आला आहे. भारतीय ओळख वापरून तो १० वर्ष भारतात राहत आहे. प्राथमिक तपासात स्लीपर सेल म्हणून त्याचा सहभाग उघड झाला” असे विशेष कक्षाचेपोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले.
प्रमोद कुशवाह पुढे म्हणाले की, त्याने जम्मू -काश्मीर, उर्वरित भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्या सहभाग असल्याची माहिती दिली. अलीकडेच त्याला दहशतवादी कारवाया करण्याचे काम देण्यात आले होते. त्याला पाकिस्तानच्या ISI ने प्रशिक्षण दिले आहे. आम्ही त्याच्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याने अनेक बनावट ओळखपत्रे बनवली होती. त्यापैकी एक अहमद नूरीच्या नावावर होते. त्याने भारतीय पासपोर्टही मिळवला होता. त्यावर तो थायलंड आणि सौदी अरेबियाला गेला होता. कागदपत्रांसाठी त्याने गाझियाबादमधील एका भारतीय महिलेशी लग्न केले. बिहारमध्ये त्याला भारतीय ओळख प्राप्त झाली. यापूर्वी तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता, अशी माहिती मिळाली आहे. ISI हँडलर कोड-नासिरने त्याला भरती केले होते आणि त्याला सूचना देत होते.