प्रेमापोटी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरला आता येथेच राहायचं आहे. शनिवारी (8 जुलै 2023) तुरुंगातून सुटल्यानंतर तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिचा प्रियकर सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. ती म्हणाली की, जर ती पाकिस्तानात गेली तर ती जिवंत राहणार नाही. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा भारतीय प्रियकर सचिन आणि सचिनच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.
आज तक या टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. तिने तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरचा दावाही फेटाळला आणि तो तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही तर गुलाम तिच्या चेहऱ्यावर मिरच्या फेकण्यासारखे धक्कादायक कृत्य करून अत्याचार करत असल्यातं सीमाचं म्हणणं आहे.
"भारतात राहण्याची परवानगी द्या"
सीमाने दावा केला की ती गेल्या चार वर्षांपासून गुलामसोबत राहत नाही आणि सचिनने तिची चारही मुले दत्तक घेतली आहेत, त्यामुळे आता तिला त्याच्यासोबत भारतात राहायचे आहे. 4 जुलै रोजी अटक केल्यानंतर सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. शनिवारी तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
गेमिंग एप PUBG ने झाली प्रेमाची सुरुवात सीमा आणि सचिन गेमिंग एप PUBG वर बोलू लागले आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. यानंतर दोघांनी लग्नासाठी वकिलाशी चर्चा केली असता सीमाकडे व्हिसा नसून ती बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. वकिलाच्या तक्रारीवरून सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक करण्यात आली असून आता पाच दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही जामीन मिळाला आहे.