पणजी - कळंगूट येथून अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरीक असलेल्या २७ वर्षीय महिलेला पुन्हा स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत तिचा पासपोर्ट मिळणार नाही, तोपर्यंत तिला तेथून बाहेर पडता येणार नाही.
गोवा पोलीस मुख्यालयात असलेल्या विदेश विभागाकडे त्या महिलेचा विषय पुन्हा आल्यानंतर पुन्हा तिला स्थानबद्धता केंद्रात ठेवण्याचा आदेश या विभागाकडून देण्यात आला. ही महिला १९ जानेवारी रोजी कळंगूट येथे संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ती पाकिस्तानी असल्याचे आढळून आले परंतु तिच्याकडे पासपोर्टसह कोणतेही अधिकृत कागदपत्र सापडले नसल्याने तिला अटक करण्यात आली. तिच्यासह तिला ठेऊन घेतलेल्या आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानी महिलेला कळंगूट येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले होते. तिला जामीन मंजूर झाल्यामुळे अटकेतून तिची सुटका झाली. कळंगूट पोलिसांनी हा तिचे विषय विदेश विभागाकडे सोपविला तेव्हा या विभागाकडून दिला पुन्हा स्थानबद्धता केंद्रात पाठविण्याचा आदेश दिला. म्हणजेच अटकेतून सुटका झाली असली तरी तिची स्थानबद्धतेतून सुटका झालेली नाही. तेथून सुटका होण्यासाठी तिला पासपोर्ट हा दाखवावाच लागणार आहे.
ही महिला नेपाळमार्गे पासपोर्ट नसतानाच भारतात आली होती. पासपोर्ट नसल्यामुळे तिला भारतात राहाण्यासाठी व्हीसाही मिळविता आला नाही. दरम्यान विदेश विभागाकडून पाकिस्तान वकालतीला या महिलेविषयी माहिती पुरविण्यात आली आहे.