नवी दिल्ली - जैश - ए - मोहम्मदचे आतंकवादी देशातील मोठ्या आणि खूप वर्दळीच्या रेल्वे स्थानकांना आणि मंदिरांवर हल्ला घडवून आणू शकतात. हरियाणा येथील रोहतक रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्याला शनिवारी अशा आशयाचे धमकीचे पत्र मिळाले आहे. पाकिस्तानमधील जैशच्या दहशतवाद्यांनी हे धमकीचे पत्र पाठविले असल्याचे तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. पत्रात रोहतक, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांना मिळालेलं हे पत्र पोष्टाने पाठविण्यात आलं आहे. त्यावर जैश - ए - मोहम्मदच्या मसूद अझहरची सही असल्याची माहिती मिळत आहे. या पत्रात ८ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकं आणि मंदिरांवर हल्ला घडवून आणून मेलेल्या आतंकवाद्यांच्या बदला घेणार असल्याचं नमूद आहे. मागील गुरुवारी जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी कठुआ येथे जैशच्या तीन आतंकवाद्यांना शस्त्र साठा आणि स्फोटकांसह अटक केली होती. ट्रकमधून हे आतंकवादी पंजाबमधील अमृतसर घाटी येथे जात होते.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेलं कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानी आतंकवादी भारतावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता. गुजरातमधील कच्छमध्ये एक संशयित बोट लष्कराला सापडली होती. त्यानंतर नौदल प्रमुखांनीही समुद्रमार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. रोहतक रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार हे पत्र रोहतक रेल्वे जंक्शन अधीक्षकांच्या नावे पाठवण्यात आले आहे. स्थानक व्यवस्थापकांना शनिवारी ३ वाजता हे पत्र मिळाले. या पत्रावर मसूद अहमद याने पाकिस्तानमधील कराचीतून पाठवल आहे असे पोलिसांनी सांगितले.