नवी दिल्ली : पालघरमधील दोन संत आणि त्यांच्या चालकाला जमावाने ठार मारल्यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना या प्रकरणाला जातीय़ रंग देऊ नका असे सांगितले आहे. तर ठाकरे सरकारवर चोहोबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. खेळाडू, अभिनेते यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनीही तोंडसुख घेतले आहे. अखेर या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.
पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राज्य सरकारवर विश्वास नसून याचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणीही विरोधाकांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप १०१ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी अफवेमुळे झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पालघरमध्ये या महान संतांच्या हत्येमध्ये ठाकरे सरकार जळून खाक होईल. या घटनेला मी कधीही विसरणार नाही, असा संताप भारती यांनी व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून म्हटले की, महाराष्ट्रत संतांची जी निर्घृण हत्या झाली त्यामध्ये एक ७० वर्षांचेही संत होते. ही घटना भयानक असून अंतरात्म्याला खूप मोठे दु:ख झाले आहे. व्हिडीओमध्ये गुन्हेगार स्पष्ट दिसत आहेत. पोलिसही आहेत तरीही हे महापाप झाले, जिथे उद्धव ठाकरेंचे सरकार आहे.
मला असे वाटत आहे की, उद्धव ठाकरे यांचे सरकार या संतांच्या हत्येमध्ये जळून राख होणार आहे. जुन्या आखाड्यासोबत जवळचे संबंध आहेत. मी या घटनेला कधीच विसरणार नाही. देशाने या घटनेची निंदा करायला हवी, अशी टीकी उमा भारती यांनी केली.