मुंबई - वकील पल्लवी पूरकायस्थ यांची हत्या करणारा आरोपी सज्जाद मुघलला पॅरोल नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने आणखी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वडाळा येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थची २०१२ मध्ये सज्जाद मुघलने हत्या केली होती. आई आजारी असल्यामुळे २०१६ साली सज्जादची ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली होती.
मार्च अखेरीस त्याने पुन्हा तुरुंगात परतणे अपेक्षित होते. पण तो फरार झाला होता. सज्जाद मुघल हा मूळचा काश्मिरी आहे. सज्जाद पकडण्यासाठी पोलीस अधिकारी संजय निकम यांना दोन महिने काश्मीरमध्ये तळ ठोकावा लागला. त्यानंतर सापळा रचून पुन्हा सज्जाद मुघलला अटक करण्यात आली. सज्जाद पॅरोलचे उल्लंघन करुन फरार झाल्यामुळे त्यावेळी तुरुंग अधीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती. वडाळा परिसरातील हिमालयन हाइट्स या सोसायटीत राहणारी पल्लवी ही एका खासगी कंपनीत वकील म्हणून कार्यरत होती. इमारतीचा सुरक्षारक्षक असलेल्या सज्जादने ९ आॅगस्ट २०१२ रोजी संधी साधून पल्लवीच्या राहत्या घरी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला म्हणून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात गुन्हे शाखेने शिताफीने सज्जादला बेड्या ठोकल्या. ३० आॅक्टोबर २०१२ रोजी सज्जादवर ४३५ पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सज्जादला ७ जुलै २०१४ मध्ये न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती.
मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेल्या सज्जादने आईची प्रकृती बरी नसल्याचे कारण पुढे करत, पॅरोलचा अर्ज केला. जम्मू-काश्मीरच्या स्थानिक पोलीस ठाण्याला रोज हजेरी लावण्याच्या अटीवर २८ फेब्रुवारी २०१६ रोजी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. मार्चअखेर त्याने स्थानिक पोलिसांना हजेरीच दिली नसल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोड पोलिसांनी सज्जाद फरार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढे हे प्रकरण तपासासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.मुंबई गुन्हे शाखाही सज्जादचा शोध घेत होती. तो जम्मू-काश्मीरमध्ये लपून बसल्याची माहिती त्यांच्या हाती लागली. तेथे तो स्वत:ची ओळख लपवून राहत असल्याने, त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या. मुंबई गुन्हे शाखा तेथे तळ ठोकून होती. त्यांनी तेथे स्वत:चे खबरी तयार केले.पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वर्षी पोलीस निरीक्षक संजय निकम यांचे सहकारी पोलीस अंमलदार दयानंद कांबळे, संदीप कांबळे, संदीप तळेकर यांनी सज्जादचा शोध घेत, त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला मुंबईत आणले. बुधवारी त्याचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात आले.