बस्ती: उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पंचायतीनं फर्मान काढल्यानंतर एका अल्पवयीन जोडप्याला तोंड काळं करून, गळ्यात चपलांची हार घालून संपूर्ण गावात फिरवण्यात आलं. यावेळी एकाही ग्रामस्थानं विरोध केला नाही.
गौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यानंतर त्यांना गुन्हेगारांप्रमाणे गावच्या पंचायतीसमोर हजर करण्यात आलं. पंचायत सदस्य न्यायाधीश म्हणून खुर्चीवर बसले. तर प्रेमी युगुलाला त्यांच्यासमोर जमिनीवर बसवण्यात आलं.
पंचायत सुरू होताच ग्रामस्थदेखील जमले. पंचायत सदस्यांनी प्रेमी युगुलाला शिक्षा सुनावली. दोघांची तोंडं काळी करून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून संपूर्ण गावात फिरवण्याचा आदेश पंचायतीनं दिला. पंचायतीच्या निर्णयाला गावातल्या कोणीही विरोध केला नाही. यानंतर दोघांची तोंडं काळी करून त्यांना गावभर फिरवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर ५ जणांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सध्या सुरू आहे.
गौर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सिंगही गावात वास्तव्यास असलेल्या एका अनुसूचित जातीतल्या मुलाचे त्याच्याच समाजातल्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांना ग्रामस्थांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासून, गळ्यात चपलांचा हार घालून गावभर फिरवण्यात आलं. याची माहिती मिळताच दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती डीएसपी शेषमणी उपाध्याय यांनी दिली.