नवी दिल्ली : सध्या राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली पोलिसांनी एका बेवारस बॅगमधून IED जप्त केले आहे. IED बॅग सापडल्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला आहे. दिल्लीच्या गाझीपूर फुल बाजारात हे स्फोटक सापडले.
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच हाय अलर्टवर असलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करत बाजारपेठ रिकामी केली आहे. ही बॅग नेमकी कुठून आली कोणी ठेवली याचा तपास सध्या सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील गाझीपूर फूल बाजारमध्ये एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली असून याची प्रथम माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॅग सापडलेला परिसर रिकामा केला. सकाळी 10.30 वाजता बॉम्बचा कॉल आला.
घटनेचे गांभीर्य पाहून एनएसजी घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर जेसीबी मागवण्यात आला. येथे खोल खड्डा खोदून बॉम्ब निकामी केल्याचे वृत्त समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे, अशीही माहिती समोर आली आहे. बॉम्बचा स्फोट झाल्याचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यावरून हे स्फोटक किती शक्तिशाली होते, हे स्पष्ट होते. दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, तपासानंतर बॅगेतून आयईडी स्फोटक बाहेर काढले. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.