कारंजा लाड : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत कामात मग्न असलेले ॲड. अरूण खंडागळे यांचे कारकुन प्रताप राजाराम राठोड (४५) यांच्यावर एका इसमाने अचानक चाकूहल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. ही घटना आज, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, कारंजा न्यायालयातील विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. अरूण खंडागळे यांचे कारकुन प्रताप राठोड हे न्यायायलयीन कामकाजात मग्न असताना त्यांच्यावर शेख एजाज शेख सत्तार (तुळजा भवानी नगर) यांनी अचानक चाकूहल्ला केला. आरोपीने राठोड यांच्या छातीवर चाकुचे वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.
रागाच्या भरातून घडली घटनाशेख एजाज शेख सत्तार आणि प्रताप राठोड हे दोघेही कारंजात एकाच काॅलनीत वास्तव्यास आहेत. राठोड यांनी पेालिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून शेख एजाजने त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे शेख एजाज शेख सत्तार यांच्याविरूद्ध पोलिसांत अनेक सामुहिक व वैयक्तिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
गुन्हेगारांची वाढली मजलकारंजा शहर परिसरात गुन्हेगारावरील पोलिसांचा वचक कमी झाल्याचे या घटनेवरून अधोरेखीत झाले आहे. आता तर गुन्हेगारांची मजल वाढली असून चक्क न्यायालय इमारतीत घुसून वकिलाच्या कारकुनावर चाकूहल्ला करण्यापर्यंत ती पोहोचली आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.