नागपूर : शहर पोलीस दलातील कर्मचारी किरण अशोकराव सलामे (वय ३०) याने त्याच्या सरकारी निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
मूळचा कोंढाळी येथील रहिवासी असलेला किरण सलामे २०१४ मध्ये शहर पोलीस दलात रुजू झाला होता. एक वर्षापासून तो सदर पोलिस ठाण्यात सेवारत होता. तो धरमपेठ परिसरातील पोलिस वसाहतीत आई आणि छोट्या भावासह राहत होता. त्याचा भाऊ खाजगी काम करतो. शनिवारी किरणची सुट्टी होती. त्यामुळे तो सायंकाळनंतर घराबाहेर पडला आणि रात्री १०.३० च्या सुमारास घरी परतला. बाजूच्या रिकाम्या कॉटर मध्ये झोपायला गेला. रविवारी सकाळी त्याच्या आईने त्याला आवाज दिला. दार आतून बंद होते. वारंवार आवाज देऊनही तो प्रतिसाद देत नसल्याने आईने शेजाऱ्यांना सांगितले. शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरच्या भागातून डोकावले असता किरण गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती कळताच पोलिस दलात खळबळ उडाली. सदरचे ठाणेदार विनोद चौधरी, सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आपल्या सहकार्यांसह पोहोचले. त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनीही घटनास्थळ गाठले.व्यक्तीगत कारणांमुळे आत्महत्या किरणने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्याने व्यक्तिगत कारणांचा उल्लेख केला आणि आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवले.किरणच्या आईचा आक्रोश या घटनेमुळे किरणच्या आईवर जबर मानसिक आघात झाला आहे. तिचा आक्रोश पहावला जात नव्हता.