उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ माजली आहे. एका मंदिरामध्ये पुजारी आणि साध्वीची हत्या करण्यात आली. दोघांच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी मंदिरात आढळून आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आजूबाजूच्या लोकांकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून मंदिरातील पुजारी आणि साध्वीच्या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महदेईया गावातील रामरतन मिश्र यांनी गावात स्व:ताच्या पैशाने मंदिर उभारले होते. या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून नेपाळमधील ढकधइया चेनपुरवा येथील महिला कलावती (६८) राहायची. ती या मंदिरात पूजाआर्चा करत असे. काही दिवसांपूर्वी पुजारी रामरतन मिश्र हे वाराणसीहून हनुमानाची मूर्ती घेऊन आले होते. मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी भोजनाचे आयोजन केले होते. आज सकाळी गावकरी मंदिरात गेले तेव्हा पुजारी आणि साध्वीचा मृतदेह आढळून आला. नंतर त्यांनी पोलिसांनी घटनेबाबत माहिती दिली. ही हत्या कोणत्या कारणांमुळे करण्यात आली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.