पालघर:- केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार कोरे गावात समुद्र किनाऱ्यावर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ माजली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केली. सापडलेली वस्तू पोलीस आणि मिलिटरीच्या वापरातील रूट मार्कर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोरे येथील समुद्र किनाऱ्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने घाबरलेल्या स्थानिक मच्छीमारांनी त्याची माहिती तात्काळ केळवे पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब डिटेक्शन स्कॉडच्या साहाय्याने ते निष्क्रिय करण्यात यश मिळविले.
केळवे सागरी पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या कोरे ह्या गावी बुधवारी 15 सप्टेंबर रोजी किनाऱ्यावरील खडकात एक बॉम्ब सदृश्य वस्तू मधून धूर निघत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड ह्यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केल्यावर साधारण पणे 2 फुटाचे एक इन्स्ट्रुमेंट लागल्याचे पाहिले.मार्कर असे लिहिलेले आणि सदर वस्तू मध्ये फॉस्फरस असल्याने सदर सामग्री हाताळू नका असा संदेश इंग्रजीत लिहिला होता.ही वस्तू ज्वलनशील असल्याने सपोनि गायकवाड ह्यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधित बॉम्ब डिटेक्शन स्कॉड(BDDS) ला पाठविण्याची विनंती केली.काही वेळाने स्कॉड आल्या नंतर त्यांनी त्या वस्तूची तपासणी केल्यावर हे रूट मार्कर असल्याचे स्पष्ट केले.ह्या वस्तूमध्ये असलेले फॉस्फरस चा हवेशी अथवा माणसाच्या संपर्कात आल्यावर पेट घेत असल्याने स्कॉड ने ते जाळून निष्क्रिय केले.त्यामुळे स्थानिक लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून किनारपट्टीवरील सुरक्षिततेसाठी 150-150 तरुणांची सागरी रक्षक दल आणि पोलीस मित्रांची टीम आपण उभी केल्याची माहिती सपोनि गायकवाड ह्यांनी लोकमत ला दिली.